तलाव आणि सरोवरे असणारी अनेक ठिकाणे राज्यात असून, अशा बहुतेक ठिकाणी पर्यटकांसाठी उत्तम सोयी करण्यात आल्या आहेत. अशा ठिकाणी शांत आणि निसर्गरम्य परिसरात तुम्ही पाऊलवाटेने भटकंती करू शकता आणि नौकाविहारही करू शकता. छायाचित्रणाची आवड असेल तर वनसंपदेबरोबरच निसर्गाची विविध रूपे तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकता.
निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेल्या ताडोबा या राष्ट्रीय उद्यानात तुम्ही अनेक वन्यजीव पाहू शकता. ताडोबाच्या परिसरात तलावाच्या बाजूने फेरफटका मारताना अनेक वनस्पती आणि प्राण्यांचे दर्शन तुम्हाला अगदी सहज घेता येते.
नागपूरपासून १३५ कि.मी. अंतरावर असलेले बोधलकसा हे घनदाट जंगलाने आणि डोंगरांनी वेढलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. इथल्या अनेक लहान-मोठ्या पायवाटांवरून तुम्ही भटकंती करू शकता. पायी फिरायचे नसेल तर इथे फेरफटका मारण्यासाठी सायकलीचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.
गंगापूर धरणाच्या काठावर उभारण्यात आलेले ग्रेप पार्क हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. निसर्गाच्या सान्निध्यात निवांत विश्रांती घेऊन ताजेतवाने व्हायचे असेल तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या.
दुसऱ्या शतकात कोरलेली ही लेणी म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट अविष्कार आहे. १९८३ साली या लेण्यांची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आली.
सुमारे ५७००० वर्षांपूर्वी दख्खन पठारावर १७.७० किमी प्रति सेकंदाच्या वेगाने झालेल्या उल्कापाताने लोणार सरोवराची निर्मिती झाल्याचे मानले जाते. लोणार सरोवराला राष्ट्रीय भौगोलिक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले असून 'रामसर' पाणथळ स्थळाचा दर्जाही देण्यात आला आहे.
पानशेत धरण हे पुण्यापासून अवघ्या ४५ कि.मी. अंतरावर आहे. सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगरांनी आणि डोंगरावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांनी वेढलेल्या धरण क्षेत्रात नौकाविहार करणे आणि साहसी खेळांमध्ये सहभागी होणे हा एक थरारक अनुभव आहे.
कोयना हा भारतातल्या सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे. शांत आणि निवांतपणा अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणाला वर्षभर भेट देत असतात.