महाराष्ट्र हे निसर्गसौंदर्याने समृद्ध राज्य आहे. पर्यटन करताना धाडसी अनुभव घेण्यास तुम्ही उत्सुक असलात तर तुमच्यासाठी राज्यात अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवताना तुम्ही वन्यजीवांचे दर्शनही घेऊ शकता. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे अशा विविध ठिकाणी पर्यटकांसाठी निवासाची आणि भोजनाची उत्तम सोय करण्यात आली आहे. मार्गदर्शकांच्या सोबतीने तुम्ही या ठिकाणी भटकंती करू शकता, जलविहार करू शकता आणि साहसी खेळांमध्येही सहभागी होऊ शकता.
पुणे शहरापासून १३८ किमी अंतरावर असलेले भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य जैवविविधतेने समृद्ध आहे. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी भीमाशंकरच्या जंगलात हमखास आढळतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे भीमाशंकर मंदिर सुद्धा या अभयारण्यात आहे.
रंगीबेरंगी फुले आणि वनसंपदेने समृद्ध असलेल्या कास पठारावर फुलांच्या तब्बल ८५० आणि दुर्मिळ प्रकारातील ३३ प्रजाती आढळतात. युनेस्कोने २०१२ साली हे ठिकाण जागतिक नैसर्गिक वारसा म्हणून घोषित केले आहे.
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात हिंगणी येथे हा बोर व्याघ्र प्रकल्प आहे. पूर्वी हे वन्यजीव अभयारण्य होते. भारतातील वाघांचे संवर्धन करण्यासाठी २०१४ साली त्याचे व्याघ्र प्रकल्पात रूपांतर करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या मधोमध वसलेले कोयना वन्यजीव अभयारण्य हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या अभयारण्यात वाघाबरोबरच भारतीय गवा, सांबर, किंग कोब्रा आणि मोठी खार असे वन्यजीव आढळतात.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट्या आणि वाघासह अनेक वन्यजीव पाहता येतील. गवताळ प्रदेश आणि अनेक जलसाठे असलेले ताडोबा-अंधारी हे राज्यातील पक्ष्यांसाठी राखीव क्षेत्रांपैकी एक आहे.
पक्षी प्रेमींसाठी नंदनवन म्हणून ओळखले जाणारे कर्नाळा अभयारण्य पनवेलपासून २०० कि.मी. अंतरावर आहे. २०० पेक्षा जास्त सुंदर पक्षी या ठिकाणी बघता येतील.
नवेगाव नागझिरा हा राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असून भारतात आढळणार्या जवळजवळ सर्व मुख्य वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती इथे आढळतात.
ठाण्याच्या खाडीतील पाण्यात फ्लेमिंगो पाहण्यासाठी तुम्ही बोटीतून फेरफटका मारू शकता. या ठिकाणी पक्ष्यांच्या १६० पेक्षा जास्त प्रजाती तुम्ही पाहू शकता.
औरंगाबादहून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर, पश्चिम घाटाच्या सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगेत गौताळा वन्यजीव अभयारण्य आहे. या अभयारण्यात २३० पेक्षा जास्त पक्षी आणि प्राणी प्रजाती आहेत.
एकूण ११६६ किमी इतक्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पात कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली नॅशनल पार्क आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. इथे बिबट्या, मोठी खार, कबुतर, सुतारपक्षी आणि हरीण असे प्राणी बघता येतील.
मेळघाट हा महाराष्ट्रातील पहिला अधिकृत व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. वाघाबरोबरच परदेशी प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींसह दुर्मिळ अशी जंगली घुबडेही या परिसरात बघता येतील.
मुंबईतले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे राज्यातील सर्वात मोठ्या संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. या राष्ट्रीय उद्यानात ७४ प्रकारचे पक्षी, फुलपाखराच्या १७० प्रजाती आणि ३५ प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात.
उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य हे ताडोबा-अंधारी, बोर, पेंच, नवेगाव-नागझिरा आणि उमरेड करंडला प्रकल्पांना जोडते. पक्षांच्या या नंदनवनात पक्ष्यांच्या तब्बल १८० प्रजाती आढळून येतात, यातील १० स्थलांतरित तर ७ अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहेत.